यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून साजरा करावा अशा आशयाचे परिपत्रक गृह विभागाने नुकतेच जारी केले. परिपत्रकानुसार सार्वजनिक गणेशोत्सवाची परवानगी महानगरपालिका तथा स्थानिक प्रशासनाकडून घेणे आवश्यक आहे. कोविड परिस्थितीत संसर्गाचा विचार करता स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपातच मंडप उभारावे. तसेच मर्यादित स्वरूपातच तसेच सजावटीत भपकेबाजी करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळासाठी गणेश मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती गणेशोत्सवासाठी दोन फुटाची गणेश मूर्ती असावी. पारंपारिक मूर्ती ऐवजी धातू संगमरवर अथवा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्यात. गणेश विसर्जन शक्यतो पुढे ढकलावे. सार्वजनिक विसर्जनाच्यावेळी गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. नसता २०२१ च्या भाद्रपद महिन्यात शक्य झाल्यास विसर्जन करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. वर्गणी जमा करताना स्वेच्छेने वर्गणीचा स्वीकार करावा. उत्सवाच्या भपकेबाज प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होऊ शकते. संसर्गाचे परिस्थिती लक्षात घेता गर्दी आकर्षित होणार नाही असे प्रदर्शन करावे. सांस्कृतिक कार्यक्रमात भजन, कीर्तन, पोवाडे यासह समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.